न्यूयॉर्क. जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा ८.४ लाख झाला आहे. यापैकी १.६४ लाख रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. जगातील बळींचा आकडा ३९,५०० वर गेला आहे. पैकी २० हजार मृत्यू गेल्या ६ दिवसांत झाले आहेत. स्पेनमध्ये दररोज सर्वाधिक मृत्यू होत आहेत. तेथे एका दिवसात ९१३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या वाढण्याबाबत अमेरिकेत सर्वात भीषण स्थिती आहे. तेथे एकाच दिवसात २० हजार रुग्णांना बाधा झाली आहे.
जगभरात एकाच दिवसांत ६० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. पैकी एक तृतीयांश रुग्ण अमेरिकेचे आहेत. अमेरिकेत सध्या १.५६ लाख रुग्ण अद्याप रुग्णाालयांत दाखल आहेत. पैकी ७१ हजार रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत. अवघ्या अमेरिकेत केवळ १० हजार रुग्णच बरे झाले आहेत. पुढील एक आठवडा सर्वाधिक घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
इराणमध्ये १ दिवसात १४१ मृत्यू, सामूहिक दहन केले जाते
जगभरात कोरोना बाधितांची संख्या ८ लाखाच्याही पुढे गेली आहे. युरोपीयन स्पेन आणि इटलीत या आजाराने सर्वाधिक मृत्यू होत आहेत. स्पेनमध्ये सोमवार ते मंगळवार दरम्यान एका दिवसात ८४९ मृत्यू झाले. हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. येथे पॉझिटिव्ह आकडा ८५१९५ वरुन ९४४१७ झाला आहे. इटलीत एका दिवसात ८१२ मृत्यू झाल्यानंतर ४ एप्रिलला संपणारे लॉकडाऊन ईस्टरपर्यंत वाढवण्यात आले आहे.
रूसः एका दिवसात सर्वाधिक ५०० रुग्ण, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक केले
रशियात कोरोनाची नवीन ५०० प्रकरणे मिळाली आहेत. हे रशियात एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. एकूण बाधित २३३७ झाले. येथे कोरोनामुळे आतापर्यंत १८ मृत्यू झाले आहेत. मॉस्को हॉटस्पॉट झाले आहे. लॉकडाऊनचे नियम कडक केले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वयस्करांपेक्षा तरुण जास्त बाधित
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये वयस्करांपेक्षा तरुण जास्त या आजाराच्या कचाट्यात आहेत. ऑस्ट्रेलियात एकूण बाधितांमध्ये २०-३९ वर्षांचे ३७% आहेत. ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे ३१% आहेत. न्यूझीलंडमध्ये २०-३९ वर्षांचे ४०% बाधित आहेत. ६० वर्षावरील २१% आहेत.
इराणः एका दिवसात ३१११ नवे रुग्ण, ४४६०६ एकूण, ३७०३ रुग्णालयात
इराणमध्ये ३१११ रुग्ण आढळले. येथे बाधितांची संख्या ४४ हजार ६०६ वर पोहोचली आहे. १४१ नवे मृत्यू झाले आहेत. मृतांचा आकडा २८९८ वर पोहोचला आहे. येथे रुग्णालयात जागा नाही. केवळ ३७०३ जण रुग्णालयात आहेत.
नेदरलँडः नेदरलँडमध्ये मृतांचा आकडा १००० च्या पुढे, एका दिवसात १७५ मृत्यू
युरोपीय देश नेदरलँडमध्ये कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या १०३९ झाली आहे. येथे ४७१२ जण रुग्णालयात दाखल आहेत. येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने सरकारला आवाहन केले की, सोशल डिस्टेंस्टिंग नियम एप्रिलपर्यंत वाढवले जावेत.